रत्नागिरीतील मिरजोळे येथील घटना; अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांची कडक कारवाई
रत्नागिरी : स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या एका तरुणाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (१२ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सार्वजनिक रस्त्यावर केली होती तलवारीने केक कापाकापी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हर्षराज पाटील याने २२ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे पाटीलवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केले होते. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हॉट्सॲप (WhatsApp) व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांच्या निदर्शनास आले.
अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग
सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारख्या घातक शस्त्राचा वापर करून मानवी जीवितास किंवा इतरांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेला धोका निर्माण करणे आणि परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणे, याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. संशयिताने रत्नागिरीच्या अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा थेट भंग केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी संशयित हर्षराज पाटील याच्याविरोधात ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ (BNS) चे कलम १२५, ‘भारतीय शस्त्र अधिनियम’ (Arms Act) ४/२५ सह ‘महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१’ चे कलम ३७(१)(३) चा भंग केल्याप्रकरणी कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसाचे असे हिंसक प्रदर्शन महागात पडल्याने परिसरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे.













