रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई; अमली पदार्थ आणि दुचाकी हस्तगत
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या काजरघाटी धारेवर गस्त घालत असलेल्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी सायंकाळी एका संशयिताला २.१० किलो गांजासह रंगेहात पकडून अटक केली. इम्रान मोहम्मद काझी (वय ३१, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गांजा आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्यादरम्यान संशयित इम्रान काझी हा दुचाकीवरून (MH 08 BB 6736) संशयास्पद रीतीने फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
झडतीत आढळला २.१० किलो गांजा
संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडे २.१० किलो ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ताब्यात घेऊन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपूसाळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांनी सहभाग घेतला.













