दिशा सालियनच्या वडिलांच्या जबाबानंतर सीबीआयची मोठी कारवाई; १४ व्या मजल्यावरून पडून झालेल्या मृत्यूची नव्याने चौकशी
दिशा सालियन मृत्यू प्रकरण : मुंबईतील बहुचर्चित दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मध्यवर्ती तपास यंत्रणेने (CBI) गुन्हा दाखल करत एफआयआर (FIR) नोंदवला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या एफआयआरमध्ये नेमकं कोणाला आरोपी करण्यात आले आहे, हे नाव अद्याप समोर आलेले नाही.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला दिशाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते; मात्र तिच्या पालकांनी तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल केली होती.
एफआयआरमध्ये हत्येसह सामूहिक अत्याचाराची गंभीर कलमे
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सहा वर्षांनी या प्रकरणात सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या (IPC) अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
कलम ३०२: हत्या
कलम ३७६: सामूहिक अत्याचार
कलम १२० (ब): गुन्हेगारी कट रचणे
कलम २०१: पुरावे नष्ट करणे
कलम २१७ आणि २१८: सरकारी कर्तव्यात कसूर करणे व खोटी कागदपत्रे तयार करणे
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील तपशील
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाल्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. या अहवालानुसार, दिशाच्या शरीरावर, हातावर, पायावर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याचे नमूद आहे. तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळेच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, त्यावेळच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही, असेही स्पष्ट नमूद करण्यात आले होते. आता सीबीआयच्या या नव्या एफआयआरमुळे या प्रकरणाला अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे.













