Phanshi Baug Ratnagiri News : झाडाच्या आडोशाला बसून गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांना अटक; रत्नागिरी शहर पोलिसांची धडक कारवाई

Phanshi Baug Ratnagiri News : झाडाच्या आडोशाला बसून गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांना अटक; रत्नागिरी शहर पोलिसांची धडक कारवाई

फणशी बाग परिसरात पोलिसांची धाड; गवळीवाड्यातील दोन तरुणांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या परिसरापासून काही अंतरावर झाडाच्या आडोशाला बसून गांजासदृश अंमली पदार्थाचे बेकायदेशीररीत्या सेवन करणाऱ्या दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री पावणे आठच्या सुमारास फणशी बाग परिसरात करण्यात आली असून, या प्रकरणी संशयितांवर एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिमांड होमच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फणशी बाग परिसरात काही तरुण संशयास्पदरीत्या झाडाच्या आडोशाला बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अचानक पाहणी केली असता, दोघे जण अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले.

गवळीवाड्यातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तौसीफ आसिफ मिरजकर (वय ३८, रा. घर क्रमांक २५६२, राहुल कॉलनी, गवळीवाडा, रत्नागिरी) आणि फैजान निसार हाजू (वय ३०, रा. घर क्रमांक २५६२, राहुल कॉलनी, गवळीवाडा, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या कारवाईनंतर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार भालचंद्र दिलीप मयेकर (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसात दाखल गुन्हा क्रमांक ३५४/२०२६ नुसार ‘एनडीपीएस कायदा १९८५’ मधील कलम ८(क), २७ आणि २९ अन्वये दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शहरात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची अशीच कडक नजर राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.