राजापूर-जैतापूर मार्गावरील घटना; अर्टिगा आणि मोरे यांच्या कारचे मोठे नुकसान, नाटे पोलिसांत गुन्हा नोंद
राजापूर : राजापूर-जैतापूर मार्गावरील होळी फाटा येथे भरधाव आणि बेदरकारपणे विरुद्ध दिशेने वाहन चालवून दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष अरविंद पारकर (वय ४८, रा. ठाणे, मूळ जैतापूर, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव असून, त्याच्याविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा अपघात १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रवीण गोपीनाथ मोरे (वय ४०, रा. ओम साई अपार्टमेंट, नित्यानंद नगर, साळवी रोड, विरार पश्चिम, मुंबई) यांनी १४ सप्टेंबर रोजी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विरारच्या मोरे कुटुंबीयांच्या कारला धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीण मोरे हे आपल्या ताब्यातील कारमधून (MH 03 ES 2000) विरार येथील रविकांत दांडेकर यांच्या कुटुंबीयांना जैतापूर मठवाडी येथे सोडून सागरी महामार्गाने परत जात होते. ते जैतापूर येथील होळी फाट्यावर आले असता, देवगडच्या दिशेने जैतापूरकडे जाणारी अर्टिगा कार (MH 46 C 1115) समोरून आली.
अर्टिगा कारचा चालक आशिष पारकर याने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने आणि विरुद्ध बाजूने चालवून मोरे यांच्या कारला थेट धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले.
नाटे पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ९७/२०२६ नुसार ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ चे कलम २८१, ३२४(५) सह ‘मोटार वाहन अधिनियम १९८८’ च्या कलम १८४ अन्वये आशिष पारकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.













