राजगुरूनगर आगाराच्या बसचा भीषण अपघात
गुहागर : गुहागर शहर परिसरातील मोडकाआगर धरणाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर आगाराची एसटी बस प्रवाशांना सोडण्यासाठी गुहागर येथे आली होती. प्रवाशांना सोडून बस गुहागरहून परतीच्या प्रवासाला जात असताना मोडकाआगर धरणाजवळ एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक बसली. हा अपघात रविवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला.
स्थानिकांनी केली मदतीसाठी धाव
या भीषण धडकेत असगोली येथील रहिवासी चैतन्य जाकळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चैतन्यला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यास मदत केली. घटनेची नोंद घेण्यात आली असून गुहागर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













