हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पाडल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; खेडमध्ये ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल

हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पाडल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; खेडमध्ये ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल

खवटी येथील सुरुची हॉटेलमध्ये पाठलाग करून बेदम मारहाण; खुर्च्या फेकून मारत दिली जीवे मारण्याची धमकी

खेड : वाहनाची हेडलाईट थेट डोळ्यावर मारल्याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा पाठलाग करून त्याला हॉटेलमध्ये बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत खवटी येथील ‘सुरुची हॉटेल’मध्ये १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अमोल दळवी याच्यासह ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेडलाईटच्या प्रकाशावरून झाला वाद

फिर्यादी अभय गौतम धोत्रे (वय २३, रा. नातुनगर वावे फाटा, खेड) आणि त्यांचा मित्र योगेश विटले हे बोरघर येथील एका चायनीज सेंटरसमोर गाडीवर बसले होते. याचवेळी आरोपींच्या ताब्यातील बोलेरो गाडीच्या (क्र. AP-0509) हेडलाईटचा तीव्र प्रकाश अभय धोत्रे यांच्या डोळ्यावर पडला. याबाबत धोत्रे यांनी जाब विचारला असता, त्याचा राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली.

हॉटेलमध्ये पाठलाग करून खुर्च्यांनी मारहाण

त्यानंतर आरोपींनी अभय धोत्रे आणि योगेश विटले यांचा पाठलाग केला. खवटी येथील सुरुची हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाठून आरोपींनी दोघांनाही हाताने व प्लास्टिकच्या खुर्च्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करताना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मित्र जखमी झाले आहेत.

खेड पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी अभय धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात आरोपी अमोल दळवी (रा. पाखरवाडी खवटी, खेड) आणि त्याच्यासोबत असलेल्या ६ ते ७ अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.