वाहन पुढे घेण्यास सांगितल्याचा राग; पोलिसाला अश्लील शिवीगाळ करत दमदाटी
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी गाडी उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या चालकाने, गाडी पुढे घेण्यास सांगणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराला अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलिसाचा अपमान करून शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक सुरळीत करताना चालकाची हुज्जत
चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८, रा. पोलीस वसाहत चिपळूण) हे १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चिपळूण नगरपरिषद परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आरोपी अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याने आपली पिवळ्या रंगाची विंगर बस (क्र. MH 03 ES 5462) रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केली होती, ज्यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
हातवारे करत अश्लील शिवीगाळ व धमकी
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस अंमलदार शिंदे यांनी चालकाला गाडी तात्काळ पुढे घेण्याची सूचना केली. याचा राग मनात धरून आरोपी अभिजित महागावकर याने धमकीच्या सुरात बोलण्यास सुरुवात केली. त्याने अश्लील शिवीगाळ व अपमानास्पद हातवारे करत सार्वजनिक ठिकाणी पोलिसाचा अपमान केला आणि शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केला.
चिपळूण पोलिसांत गुन्हा नोंद
या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रितेश शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी अभिजित महागावकर याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१, २२४, ३५२, २८५ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.













