रत्नागिरी शहरात अमली पदार्थांवर पोलिसांची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, एकाला अटक

रत्नागिरी शहरात अमली पदार्थांवर पोलिसांची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, एकाला अटक

नाचणे काजरघाटी तिठ्यावर शहर पोलिसांचा छापा; मोटारसायकलसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. नाचणे काजरघाटी तिठ्यानजीक पाण्याच्या टाकीजवळ विक्रीसाठी आणलेला २ किलो १७४ ग्रॅम वजनाचा गांजा शहर पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा आणि मोटारसायकलसह एकूण १ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाचणे काजरघाटी तिठ्यावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दीपक मनोहर साळवी आणि त्यांच्या पथकाने १५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नाचणे काजरघाटी तिठा, पाण्याच्या टाकीजवळ संशयित हालचालींवर पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी रस्त्यालगत दुचाकीवर बसलेला इसम पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करताना आढळून आला.

१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी गजाआड

पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडील राखाडी रंगाच्या सॅक बॅगमधील निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत २ किलो १७४ ग्रॅम निव्वळ गांजा (किंमत रु. १,०८,७००/-) आढळून आला. पोलिसांनी गांजासह गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MH 08 BB 6736) असा एकूण १ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी इम्रान मेहम्मद काझी (वय ४७, रा. घर नं. ९९४, जैनम मंजिल, गवळीवाडा, रत्नागिरी) याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्ट १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.