खेडमध्ये ५ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; भरणे नाका येथील घटना

खेडमध्ये ५ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; भरणे नाका येथील घटना

‘सनसिटी’ कन्स्ट्रक्शन साईटवर तोल गेल्याने दुर्घटना; बिहारमधील २९ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड : खेड शहरालगत भरणे नाका परिसरातील एका बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने २९ वर्षीय परप्रांतीय मजुराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इदहारअली हदीस मनसुरी (वय २९, मूळ रा. संतपूर मांजागढ, जि. गोपालगंज, राज्य बिहार) असे मृत मजुराचे नाव असून, या घटनेमुळे खेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाचव्या मजल्यावरून पोडियम स्लॅबवर कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, भरणे नाका येथील ‘सनसिटी कन्स्ट्रक्शन साईट’च्या सी-विंग इमारतीवर १५ सप्टेंबर रोजी बांधकाम व इतर कामकाज सुरू होते. यावेळी पाचव्या मजल्यावर काम करत असताना इदहारअली मनसुरी याचा अचानक तोल गेला आणि तो लाकडी फळीसह थेट खाली पोडियम पार्किंगच्या स्लॅबवर जोरदार आदळला. या भीषण अपघातात त्याच्या डोक्यास, हातास आणि छातीस गंभीर मुका मार लागून तो गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान मृत्यू; खेड पोलिसांत नोंद

अपघातानंतर साईटवरील इतर कामगार व व्यवस्थापनाने त्याला तात्काळ उपचारासाठी खेड येथील मधूसिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (आमृ. क्र. ७६/२०२६) नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.