Anuskura Ghat Accident: अनुस्कुरा घाटात आयशर टेम्पो पलटी; ब्रेक फेल झाल्याने अपघात, २० प्रवासी थोडक्यात वाचले

Anuskura Ghat Accident: अनुस्कुरा घाटात आयशर टेम्पो पलटी; ब्रेक फेल झाल्याने अपघात, २० प्रवासी थोडक्यात वाचले

नमन मंडळाची गाडी देवरुखला परतताना दुर्घटना

पाचल : पन्हाळा-कोल्हापूर येथून अनुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अनुस्कुरा घाटात भीषण अपघात झाला. या वाहनातून प्रवास करणारे २० प्रवासी सुदैवाने थोडक्यात वाचले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे नमनाचा कार्यक्रम आटोपून हे सर्व प्रवासी देवरुखच्या दिशेने परतत होते. अनुस्कुरा घाटातून जात असताना अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालक सुभाष वास्कर (रा. देवरुख) यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि आयशर रस्त्यावर पलटी झाले.

ग्रामस्थांची धाव अन् आमदारांची मदत

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, पलटी झालेले वाहन रस्त्याच्या मध्यभागी आल्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पांगरीचे सरपंच अमर जाधव यांच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांनी तातडीने क्रेनची व्यवस्था करून दिली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त आयशर बाजूला हलवल्यानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल घाटगे आणि पोलीस कॉन्स्टेबल संपत माने यांनी अपघातस्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.