विवाह सोहळ्यावरून परतताना झालेल्या भीषण अपघातातील सर्व ३ तरुणांचा मृत्यू
रत्नागिरी : देवरुख येथे विवाह सोहळा आटोपून घरी परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या तरुणाची तब्बल सहा महिन्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. विकास चंद्रकांत कांबळे असे या मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १२ सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण हातखंबा परिसरावर शोककळा पसरली आहे.
हातखंबा येथील तीन तरुण २६ एप्रिल रोजी देवरुख येथे एका लग्नकार्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विकास चंद्रकांत कांबळे हा गंभीर जखमी झाला होता.
दोन शस्त्रक्रियांनंतरही कोमात; अखेर निष्प्राण
डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या विकासवर सुरुवातीला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मात्र अपघातानंतर तो कोमातच राहिला. अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याला ठाणे आणि त्यानंतर मुंबईतील कांदिवली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने १२ सप्टेंबर रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला वाचवण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र निधनाच्या वार्तेने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अश्रूधालसांत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.













