पोलीस, आरोग्य व पाटबंधारे विभागाचे अधिकारीही रंगेहात गजाआड; ऑडिओ-व्हिडिओ पुरावा देऊन तक्रार करण्याचे आवाहन
रत्नागिरी : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत विभागाने एकूण ८ प्रकरणांमध्ये एका खासगी मध्यस्थासह तब्बल ११ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया महसूल विभागात झाल्याचे समोर आले आहे.
महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभागाशी संबंधित तब्बल ५ प्रकरणांत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि एका कोतवालाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पोलीस प्रशासनातील एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक व एका खासगी मध्यस्थावर कारवाई झाली. तसेच सार्वजनिक पाटबंधारे विभागातील एका प्रकरणात कार्यकारी अभियंता व लिपिक, तर आरोग्य विभागातील एका प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
ऑडिओ-व्हिडिओ पुरावा नोंदवून ॲपवर तक्रार करा
शासकीय कामांसाठी कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्याला बळी न पडता थेट विरोध करावा. लाचेची मागणी होताच नागरिकांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईलद्वारे ऑडिओ अथवा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. हा सबळ डिजिटल पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या www.acbmaharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपवर तक्रारीसह अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक
लाचखोरीच्या विरोधात नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे. तक्रारीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
टोल फ्री क्रमांक : १०६४
व्हॉट्सॲप हेल्पलाईन : ७०३८३९१०६४
दूरध्वनी क्रमांक : ०२३५२-२२२८९३













