५ तास २२ मिनिटांत सर केले आव्हानात्मक अंतर; विरळ ऑक्सिजनवर मात करत दाखवली अफाट जिद्द
रत्नागिरी : समुद्रसपाटीपासून तब्बल ११,५०० फूट उंचीवर, अत्यंत विरळ ऑक्सिजन आणि आव्हानात्मक चढ-उतारांच्या निसरड्या मार्गावर ४२.१९५ किलोमीटर अंतराची अत्यंत खडतर ‘लडाख मॅरेथॉन’ अवघ्या ५ तास २२ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करत रत्नागिरीचे सुपुत्र व अल्ट्रा रनर अभिजित अशोक पड्याळ यांनी रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक धैर्याचा कस पाहणाऱ्या या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत त्यांनी मिळवलेले यश कोकणातील तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे.
ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेवर मात
लडाख मॅरेथॉनचा मार्ग चोगलमसर, चुचोट आणि स्टकना या दुर्गम परिसरातून जातो. अतिउंची, सततचे चढ-उतार आणि ऑक्सिजनचे अत्यंत कमी प्रमाण यामुळे ही स्पर्धा धावपटूंसाठी जगातील सर्वांत आव्हानात्मक मॅरेथॉन मानली जाते. अभिजित यांनी पहिले २१ किलोमीटर वेगाने पार केले. मात्र पुढील टप्प्यात उंची वाढल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अभिजित यांनी मनाचे खच्चीकरण होऊ न देता, वेग आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर ५ तास २२ मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी (Acclimatization) ते स्पर्धेच्या आठ दिवस आधीच लडाखमध्ये दाखल झाले होते.
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स ते लडाख; उल्लेखनीय क्रीडा प्रवास
अभिजित यांच्या खात्यावर यापूर्वीही अनेक ऐतिहासिक कामगिरींची नोंद आहे:
▪️टाटा मुंबई मॅरेथॉन : ४२ किमी अंतर ३ तास ५८ मिनिटांत पार करून ‘सब-४’ (Sub-4) क्लबमध्ये स्थान.
▪️कॉम्रेड्स मॅरेथॉन (दक्षिण आफ्रिका) : ८६ किमी अंतर ९ तास ५१ मिनिटे १२ सेकंदांत पूर्ण करून मानाचे ‘रॉबर्ट मत्शाली मेडल’ पटकावले.
▪️लोहापुरुष स्पर्धा : राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
▪️सावंतवाडी रन : सलग ६ तास धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
सातत्य आणि मानसिक ताकद यशाची गुरुकिल्ली : अभिजित पड्याळ
"लडाख मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्याची खरी परीक्षा आहे. प्रशिक्षणासोबत मानसिक ताकद आणि सातत्य असल्यास यश निश्चित मिळते," अशा शब्दांत अभिजित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या यशात प्रशिक्षक दादासो सत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रवासात प्रेरणा देणारे श्री देव भैरी व सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचे आशीर्वाद, केसीएम (KCM), आरसीसी (RCC) मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.













