Chiplun Crime News: चिपळूण नगरपरिषदेसमोर पोलिसाला धमकी व शिवीगाळ; विंगर चालकावर गुन्हा दाखल

Chiplun Crime News: चिपळूण नगरपरिषदेसमोर पोलिसाला धमकी व शिवीगाळ; विंगर चालकावर गुन्हा दाखल

वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेसमोरील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करून ते बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका विंगर बस चालकाविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहतूक कोंडी अन् अश्लील शिवीगाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अभिजित महागावकर याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस (MH 03 ES 5462) चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी केली होती. यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, पोलिस कर्मचारी प्रितेश शिंदे हे शहरात गस्तीवर असताना त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महागावकर याला गाडी पुढे घेण्याची सूचना केली. यावरून संतापलेल्या महागावकर याने पोलिस कर्मचाऱ्याला धमकी देत हातवारे केले आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून अपमान केला. शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा नोंदवला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.