Vijay Wadettiwar On Manoj Jarange: ‘सरकार मनोज जरांगेंना फसवतेय, तेही वारंवार फसतात’; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Vijay Wadettiwar On Manoj Jarange: 'सरकार मनोज जरांगेंना फसवतेय, तेही वारंवार फसतात'; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

सणासुदीच्या काळात लोकांना वेठीस धरू नका; वडेट्टीवारांचे जरांगे पाटलांना आवाहन, सरकारच्या भूमिकेवरही टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई कूच आंदोलनावरून राज्यातील राजकारण भडकले आहे. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "सरकार मनोज जरांगेंना वारंवार का फसवते आहे आणि जरांगे स्वतः का फसतात? ते मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात आणि गुलाल उधळत परत येतात," असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

पाटोदा येथे मध्यरात्री २ वाजता सभा घेऊन जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना खालावलेल्या प्रकृतीमुळे प्रवासाचा धोका न पत्करण्याचा सल्ला दिला आहे. या संपूर्ण घडामोडींवर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे यांच्यातील करारांची समीक्षा करण्याची गरज असल्याचे म्हटले.

लोकशाहीत आहोत की राजेशाहीत? – वडेट्टीवार

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या स्वरूपावर सवाल उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले, "ज्या पद्धतीने जरांगेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा चालला आहे, तो जोश पाहून आपण नक्की लोकशाहीत आहोत की राजेशाहीत? असा प्रश्न पडतो. जरांगे यांच्या मागण्या वारंवार बदलत चालल्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध नाही, परंतु रोज नवनवीन गॅझेट शोधून आणले जात आहेत." तसेच, गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात लोकांना वेठीस न धरता आंदोलन टाळावे, असे आवाहनही त्यांनी जरांगे यांना केले.

सरकार आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अपयशी

यावेळी वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. "मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री म्हणतात की जरांगे हिंदूंच्या सणात अडचणी आणत आहेत. पण हे सरकारचेच अपयश आहे. एवढे मोठे सरकार असूनही ते शेपूट घालून का बसले आहे? जर हे आंदोलन असंवैधानिक असेल तर ते योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे," असे म्हणत त्यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला.