२,००० रुपयांवरील मर्चंट यूपीआय व्यवहारांवर एमडीआर (MDR) लावण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र; अमेरिकन कंपन्यांसमोर शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप
नवी दिल्ली:
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने यूपीआय (UPI) व्यवहारांवर कर आकारण्याचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) व्हिडिओ पोस्ट करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका विचारसरणीचा उल्लेख केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "इंदिराजींना एकदा विचारण्यात आले होते की त्यांचा कल डाव्या बाजूला (Left) आहे की उजव्या बाजूला (Right)? त्यावर उत्तर देताना इंदिराजींनी स्पष्ट केले होते की, त्यांचा कल कोणत्याही एका बाजूला नसून त्या सरळ आणि थेट विचारांच्या आहेत." मात्र, नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णपणे वेगळी असल्याचा टोला त्यांनी लगावला. "मोदीजी डाव्या बाजूलाही नाहीत आणि उजव्या बाजूलाही नाहीत, तर त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे," असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदी सरकारने हळूच चोरट्या मार्गाने यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग खुला केला आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नियमातील बदलांवर बोट ठेवले. केंद्र सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, २,००० रुपयांवरील मर्चंट यूपीआय व्यवहारांवर ‘एमडीआर’ (Merchant Discount Rate) लावण्यात येईल. व्यवहारांच्या एकूण संख्येत २,००० रुपयांवरील व्यवहारांचे प्रमाण अवघे ५ टक्के असले, तरी एकूण यूपीआय व्यवहारांच्या मूल्याच्या तब्बल ६५ टक्के व्यवहार हे याच श्रेणीतील असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारकडून ग्राहकांवर थेट कोणतीही फी आकारली जाणार नाही असा दावा केला जात असला, तरी दुकानदारांवर बसणारा हा अतिरिक्त आर्थिक भार शेवटी वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवून ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जाईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला. अमेरिकन पेमेंट कंपन्या दीर्घकाळापासून भारताच्या झिरो-एमडीआर (Zero-MDR) धोरणाचा विरोध करत होत्या आणि मोदी सरकारने अमेरिकन दबावापुढे नतमस्तक होऊन याच दिशेने धोरण बदलले आहे, असा आरोप त्यांनी केला. "मोदीजी, अमेरिकेसमोर झुकणे बंद करा, धाडस दाखवा आणि यूपीआयवरील हा कर तात्काळ मागे घ्या," अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.













