Heavy Rain in Ratnagiri: ओल्या पावलांनी गौरी येणार! रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Heavy Rain in Ratnagiri: ओल्या पावलांनी गौरी येणार! रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

तासभर मुसळधार; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये समाधान

Heavy Rain in Ratnagiri मुळे गौरीच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ‘ओल्या पावलांनी गौरी येतात’ या कोकणवासीयांच्या पूर्वापार श्रद्धा आणि अनुभवाला साजेसे वातावरण बुधवारी साडेपाचच्या सुमारास पाहायला मिळाले. रत्नागिरी शहराला तब्बल तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Heavy Rain in Ratnagiri मुळे बाजारपेठेत खरेदीदारांची पळापळ

गणेशोत्सवाच्या उत्साहात गौरीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ उडाली. गौरी-गणपतीसाठी देवीचे मुखवटे आणि पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी पावसाने जोर धरल्याने नागरिकांनी आसरा शोधण्यासाठी धाव घेतली. अवघ्या काही वेळातच रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि पावसाची आकडेवारी

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. हवामान विभागाने १३ आणि १४ सप्टेंबरला येलो अलर्ट दिला होता, मात्र तुरळक ठिकाणे वगळता बहुतांश भागात प्रतीक्षा कायम होती. १ जून ते १६ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी सुमारे २५०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गतवर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ८५० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. जून आणि ऑगस्टमध्ये पावसाने मोठी निराशा केली असली तरी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काहीशी भरपाई केली होती.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी झालेली पावसाची हजेरी कोकणातील श्रद्धेला उजाळा देण्यासोबतच शेती पिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे.