हॉटेल स्वामी समर्थच्या मागील खोलीत सुरू होता बनावट दारूचा खेळ; गोव्यातील मुख्य सूत्रधारासह जागामालकाला अटक
राजापूर / रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील तळगाव येथे संयुक्त कारवाई करत परराज्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध बॉटलिंग कारखाना उद्ध्वस्त केला आहे. तळगाव येथील ‘हॉटेल श्री. स्वामी समर्थ’च्या मागील खोलीत सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा दारूसाठा, अत्याधुनिक बॉटलिंग मशिन आणि लाखो बाटल्या-बुचांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात जागामालकासह गोव्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
हॉटेलच्या पाठीमागे सुरू होते बेकायदेशीर बॉटलिंग युनिट
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने पंचांसह तळगाव येथील हॉटेल श्री. स्वामी समर्थ येथे अचानक छापा टाकला. हॉटेलच्या मागील खोलीची झडती घेतली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची ‘रॉयल ब्ल्यू व्हिस्की’चे लेबल असलेले ५६ बॉक्स आणि दोन ३० लिटरच्या कॅनमध्ये भरलेला ६० लिटर दारूचा ब्लेंड आढळून आला.

१ कोटी ५ लाखांचा विक्रमी मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून अवैध दारू निर्मिती व बॉटलिंगसाठी लागणारे प्रचंड साहित्य जप्त करण्यात आले आहे:
अत्याधुनिक साहित्य : अत्याधुनिक बॉटलिंग मशिन, पाण्याचे मोठे टँकर्स (५०० व १००० लिटरच्या टाक्या), मोटर व होजपाइप.
बाटल्या व बुचे : ‘मेन्शन हाऊस’ छापलेली तब्बल ८६,४०० पत्र्याची बुचे, ‘ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्की’चे लेबल रोल्स, १,८०० बॉक्समध्ये भरलेल्या ८६,४०० रिकाम्या बाटल्या आणि १,६८० काचेच्या बाटल्या.
इतर साहित्य : कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स, जाळ्या, गोण्या, फर्निचर आणि २ मोबाईल संच.
जागामालकासह गोव्यातील साथीदार ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी जागामालक दिनेश शांताराम जैतापकर (रा. तळगाव, ता. राजापूर) आणि गोव्यातून दारू रॅकेट चालवणारा संशयित चंदन उर्फ शंकर बाळू पाटील (रा. कुट्टालिन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भरारी पथक निरीक्षक अमित पाडळकर, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे, उपअधीक्षक ओंकार महाजन व दोन्ही जिल्ह्यांतील अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास भरारी पथक निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.
अवैध दारूविरोधात माहिती देण्याचे आवाहन
जिल्ह्यात कुठेही परराज्यातील अवैध दारू, बनावट दारू किंवा हातभट्टीची निर्मिती होत असल्यास नागरिकांनी तात्काळ उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्र. ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.













