सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल अकाउंट’ रॅकेट उघडकीस; एसबीआय खातेदारासह साथीदारावर देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल

सायबर गुन्हेगारांचे 'म्युल अकाउंट' रॅकेट उघडकीस; एसबीआय खातेदारासह साथीदारावर देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाईन सायबर फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी बँक खात्याचा वापर; दापोली पोलिसांच्या तपासात निष्पन्न

देवरूख : देशभरात सायबर फसवणूक करून नागरिकांना लुटणाऱ्या रॅकेटमधील रक्कम फिरवण्यासाठी बँक खात्यांचा (म्युल अकाउंट) गैरवापर करणाऱ्या एका खातेदारासह त्याच्या अज्ञात साथीदाराविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्याचा वापर करून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारणे आणि ती इतर खात्यांवर हस्तांतरित केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सायबर गुन्ह्यातील रक्कम खात्यावर वळवली

मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून संशयित आरोपी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विशिष्ट बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीच्या व्यवहारांसाठी करत होता. दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तसेच देशभरात दाखल असलेल्या ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील रकमा थेट या एसबीआय खात्यामध्ये जमा केल्या जात होत्या. त्यानंतर आरोपी खातेदाराने ही रक्कम सायबर गुन्हेगार असलेल्या आपल्या साथीदारांना पुढील इतर संशयास्पद खात्यांमध्ये हस्तांतरित (Transfer) करण्याची मुभा दिली होती.

infigo

दापोली पोलिसांच्या फिर्यादीवरून देवरूखमध्ये गुन्हा

दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संतोष गणपत चव्हाण (ब.नं. ६८५) यांनी या आर्थिक गैरव्यवहाराचा छडा लावून दिलेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा संबंधित अज्ञात खातेदार आणि त्याचे साथीदार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६५(ई) अन्वये सायबर फसवणुकीचा गुन्हा (गु.र.नं. १४८/२०२६) दाखल करण्यात आला असून पोलीस त्या खात्याचा आणि खातेदाराचा तांत्रिक माग काढत आहेत.