“तुला पेट्रोल टाकून जाळून टाकेन” म्हणत डोक्यात ठोसे मारून केले जखमी; सावर्डे पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल
सावर्डे (चिपळूण) : दुकानामध्ये माल भरण्यासाठी माहेरहून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने विवाहितेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे घडली आहे. मारहाण करताना पतीने "तुला मारून टाकेन, अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देईन" अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेरहून २५ हजार रुपये आणण्यासाठी तगादा
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे कासारवाडी येथील रहिवासी उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८) याने १५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी पल्लवी मोहिरे (वय ३५) हिच्याकडे दुकानात नवीन माल भरण्यासाठी "तुझ्या आईकडून २५ हजार रुपये आण" असा तगादा लावला. मात्र, पल्लवी यांनी माहेरहून पैसे आणण्यास स्पष्ट नकार दिला.

लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण
पैसे आणण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या उभयचंद मोहिरे याने पत्नीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने पल्लवी यांच्या दोन्ही कानाखाली मारून डोक्यावर ठोशाने जोरदार प्रहार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने लाकडी दांडके उचलून त्यांच्या डाव्या कुशीवर आणि उजव्या गुडघ्यावर जोरदार मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच "तुला मारून टाकेन, तुझ्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकेन" अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
सावर्डे पोलिसांत गुन्हा नोंद
या मारहाणीत जखमी झालेल्या पल्लवी मोहिरे यांनी सावर्डे पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सावर्डे पोलिसांनी आरोपी पती उभयचंद मोहिरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













