रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार
Ratnagiri Teacher Recruitment च्या अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सन २०२२ व २०२६ मध्ये निवड झालेल्या सर्व शिक्षक सेवक उमेदवारांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून या समुपदेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. शिक्षकांची ४७८ पदे आणि कागदपत्र पडताळणीचा तपशील
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल १ हजारहून अधिक पदे रिक्त असून पवित्र पोर्टलद्वारे ४७८ शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. सलग तीन दिवस उपस्थित शिक्षकांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. त्यापैकी २१ उमेदवारांनी दांडी मारली होती, त्यांना पुन्हा एकदा सोमवारी संधी दिली गेली. मात्र त्या दिवशीही हे उमेदवार गैरहजर राहिले. दरम्यान, ४५७ उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी होऊन कित्येक दिवस झाले तरी समुपदेशन झाले नव्हते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने विचारणा होत होती. अखेर २२ सप्टेंबर रोजी या शिक्षक उमेदवारांच्या समुपदेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. समुपदेशनाचे तीन सत्रांतील वेळापत्रक
शिक्षकांच्या समुपदेशनासाठी तीन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे:सत्र पहिले (सकाळी ९ ते दुपारी १२): सन २०२२ मधील उपशिक्षक, पदवीधर गणित व विज्ञान उमेदवार (मराठी व उर्दू माध्यम), तसेच मराठी माध्यमातील पदवीधर (विज्ञान, गणित) दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवार.सत्र दुसरे (दुपारी १२ ते १): उर्दू माध्यमातील सर्व पदवीधर (गणित-विज्ञान) व उपशिक्षक (दिव्यांग, महिला व पुरुष) उमेदवार.सत्र तिसरे (दुपारी ३ ते सायंकाळी ५): मराठी माध्यमातील सर्व उपशिक्षक (दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवार). चरित्र पडताळणी आणि नियुक्तीबाबतच्या अटी

दरम्यान, २०१-२०२० काळातील टीईटी गैरप्रकारासंदर्भात गुन्हे अन्वेषण शाखा (पुणे) यांच्याकडून चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त झाल्यानंतरच उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच समांतर आरक्षण (प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व खेळाडू) या आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी संबंधित कार्यालयाकडून पूर्ण झाल्यानंतरच त्यांना अंतिम नियुक्ती दिली जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असून ४५७ उमेदवारांचे समुपदेशन २२ सप्टेंबर रोजी होईल. सर्व संबंधित उमेदवारांनी दिलेल्या वेळेत व ठिकाणी उपस्थित राहावे; समुपदेशनासाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे."













