तातडीने डागडुजी करण्याची मागणी
मंडणगड:
Mandangad Phatgaon Road Potholes मुळे मंडणगड शहरापासून पाटगावकडे जाणाऱ्या नगरपंचायत हद्दीतील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाहतुकीसाठी खडतर प्रवास आणि अपघाताची शक्यता
मंडणगड ते पाटगाव या मार्गाचा बहुतांश भाग मंडणगड शहरातून जातो आणि तो नगरपंचायत हद्दीमध्ये समाविष्ट आहे. सध्या या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे.

रस्त्याच्या मुख्य भागासोबतच साईटपट्टीवर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे एकाच वेळी दोन वाहने समोरासमोरून जाणे कठीण झाले असून या मार्गावरील प्रवास अत्यंत खडतर बनला आहे. दुचाकी आणि चारचाकीने प्रवास करताना चालकांना कसरत करावी लागत असून अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर बळावली आहे.
Mandangad Phatgaon Road Potholes आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरपंचायतीने तात्काळ या रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि साईटपट्टी सुस्थितीत करावी, अशी रास्त मागणी शहर व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
या मार्गावरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी नियमित ये-जा करत असतात. तरीदेखील रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याची माहिती पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश कांबळे यांनी दिली आहे. प्रशासनाने किमान हे खड्डे लवकरात लवकर बुजवून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













