बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने पर्समधून लांबवले दागिने; देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल
देवरूख / साखरपा : गणेशोत्सवाच्या धामधुमीत गावी आलेल्या मुंबईतील एका महिला प्रवाशाचे तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बसस्थानकातून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील ५ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी चतुराईने लंपास केली. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसमध्ये चढताना साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील आणि सध्या परळ, मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या सौ. विनिता विकास अवसरे (वय ४८) या आपल्या पतीसह संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली येथे जाण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी सकाळी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून संगमेश्वर मार्गे चिपळूणकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये त्या चढत होत्या. बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विनिता यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स उघडून त्यातील छोट्या पाकिटात ठेवलेले दागिने चोरून नेले.

२ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
चोरीस गेलेल्या ऐवजात खालील मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे:
सोन्याचे मंगळसूत्र : अंदाजे ५ तोळे वजनाचे, किंमत रु. २,५०,०००/-
सोन्याची अंगठी : अंदाजे साडेतीन ग्रॅम वजनाची, किंमत रु. १५,०००/-
(एकूण चोरीस गेलेला ऐवज : रु. २,६५,०००/-)
तब्येत बिघडल्याने तक्रार देण्यास विलंब; तपास सुरू
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी विनिता अवसरे यांना मानसिक धक्का बसला. त्यातच त्यांना मधुमेहाचा (शुगर) त्रास असल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी १७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा देवरूख पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून साखरपा बसस्थानक परिसरातील हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत.












