खेडमध्ये बांधकाम साईटवर सेफ्टी नेट नसणे मजुराच्या जीवावर बेतले; कंत्राटदारांसह दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

खेडमध्ये बांधकाम साईटवर सेफ्टी नेट नसणे मजुराच्या जीवावर बेतले; कंत्राटदारांसह दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

५ व्या मजल्यावरून पडून बिहारमधील तरुणाचा झाला होता मृत्यू; निष्काळजीपणा भोवला

खेड : खेड शहरातील भरणे नाका परिसरातील ‘सनसिटी’ इमारतीच्या बांधकाम साईटवर ५ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. सुरक्षेसाठी आवश्यक असणारी ‘सेफ्टी नेट’ न लावता निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गौरव वाल्मिक लांडगे आणि सुशांत भगवान तांबे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेफ्टी नेट नसल्याने थेट स्लॅबवर आदळला मजूर

मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास भरणे येथील मंगळवार बाजार लगत असलेल्या सनसिटी बिल्डिंगच्या सी-विंगमध्ये पाचव्या मजल्यावर सेन्ट्रिंगचे काम सुरू होते. मूळचा बिहारचा असलेला कामगार इजहारअली हदिसमियों मन्सुरी (वय २९) हा सेन्ट्रिंगसाठी लागणारी लाकडी फळी देत असताना अचानक त्याचा तोल गेला. बांधकाम साईटवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी (Safety Net) किंवा आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेतलेली नसल्यामुळे तो लाकडी फळीसह थेट खाली पोडियम पार्किंगच्या काँक्रीट स्लॅबवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत डोक्याला, डाव्या हाताला आणि छातीला गंभीर मुका मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

infigo

तपासानंतर दोघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, प्रत्यक्षदर्शी फिर्यादी मोहम्मद नसीम राजा मन्सुरी (वय २७, मूळ रा. गोपालगंज, बिहार) यांच्या तक्रारीवरून आणि घटनास्थळाच्या तपासणीनंतर कामाच्या ठिकाणी मजुरांच्या जीविताच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे समोर आले. या निष्काळजीपणामुळे आरोपी गौरव वाल्मिक लांडगे (रा. वेरळ, खेड) आणि सुशांत भगवान तांबे (रा. शिरवली बौद्धवाडी, खेड) यांच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.