१२ नॉटिकल मैलांच्या आत १८-२० मिमी जाळ्यांचा बेकायदेशीर वापर; समुद्रात रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आश्वासन
रत्नागिरी:
Ratnagiri Illegal LED Fishing Dispute प्रकरणी रत्नागिरी परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली बेकायदेशीर एलईडी लाईट आणि मिनी पर्ससीन (रिंग सीन) मासेमारी तातडीने बंद करण्याची आक्रमक मागणी जयहिंद मच्छिमार सहकारी संस्था (भाटीमिऱ्या) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मत्स्यव्यवसाय आयुक्तांना निवेदनाद्वारे कारवाईचे साकडे घालण्यात आले आहे.
मिरकरवाडा बंदरात परराज्यातील व स्थानिक नौकांची बेकायदेशीर मासेमारी
निवेदनात नमूद केल्यानुसार, मिरकरवाडा बंदरात काही यंत्रचलित नौका ६ ते ७ वाव खोल पाण्यात प्रखर एलईडी लाईट लावून बेकायदेशीरपणे मासेमारी करत आहेत आणि मासळी थेट बंदरात उतरवत आहेत.

तसेच राज्याच्या १२ नॉटिकल मैल जलधी क्षेत्रात (सुमारे ७ ते ८ नॉटिकल मैलांमध्ये) शासकीय बंदी असलेल्या १८ ते २० मिमी आस साईजच्या लहान मिनी पर्ससीन जाळ्यांचा वापर केला जात आहे. या प्रकारामुळे लहान मासळी मारली जाऊन ती ‘फिशमील’साठी वापरली जात असून सागरी मत्स्यसंपदेचा मोठा ऱ्हास होत आहे. या बेकायदेशीर नौकांवर दंडात्मक कारवाई केल्यास शासनाच्या तिजोरीत लाखोंचा महसूल जमा होईल आणि पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळेल, असा दावा जयहिंद मच्छिमार संस्थेचे सचिव दत्तगुरू कीर यांनी केला आहे.
Ratnagiri Illegal LED Fishing Dispute: ड्रोन आणि गस्तीद्वारे कारवाईचे आदेश
१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामाच्या पहिल्याच महिन्यात एलईडी मासेमारी सुरू झाल्याने पारंपरिक व छोट्या मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून आतापर्यंत अशा कितीने बेकायदेशीर नौकांवर गस्ती नौका किंवा ड्रोनद्वारे कारवाया केल्या, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या समस्येची दखल घेत सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी जीवन सावंत यांनी स्पष्ट केले की, समुद्रात रात्रीच्या वेळी विशेष गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसा ड्रोणच्या साहाय्याने लक्ष ठेवले जात असून, नुकत्याच झालेल्या पाहणीत काही संशयास्पद नौकांवर कायदेशीर केसेस नोंदवून कारवाई सुरू करण्यात आली आहे.













