Chiplun Bike Accident: दुचाकीच्या हँडलला पिशव्या लोंबकळणे पडले महाग; नियंत्रण सुटून अपघातात वृद्धाचा मृत्यू

Chiplun Bike Accident: दुचाकीच्या हँडलला पिशव्या लोंबकळणे पडले महाग; नियंत्रण सुटून अपघातात वृद्धाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर कोडमला फाट्याजवळील दुर्दैवी घटना; सावर्डे पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Chiplun Bike Accident प्रकरणात दुचाकीच्या हँडलला अडकवलेल्या पिशव्यांमुळे ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) हा अपघात घडला. प्रदीप गणपत पाटील (वय ६०, रा. शंकरवाडी, चिपळूण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हँडलमध्ये पिशव्या अडकल्याने सुटला ताबा

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप पाटील हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलवरून सावर्डेहून चिपळूणच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. त्यांनी दुचाकीच्या दोन्ही हँडलला केबल आणि विद्युत साहित्य असलेल्या दोन प्लास्टिकच्या पिशव्या लोंबकळत्या अवस्थेत अडकवल्या होत्या. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ते कोडमला फाटा येथील चढावातील वळणावर आले असता, हँडलला अडकवलेल्या पिशव्या अचानक हँडलमध्येच अडकल्या. यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने पाटील हे मोटारसायकलसह रस्त्यावर कोसळले.

tata motars

गंभीर दुखापतींमुळे जागीच प्राणज्योत मालवली

या अपघातात प्रदीप पाटील यांच्या तोंडाला आणि चेहऱ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. हँडलला धोकादायक पद्धतीने पिशव्या अडकवून वाहन चालवल्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आणि ते स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

सावर्डे पोलिसांत गुन्हा नोंद; तपास सुरू

या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्निल विजय साळवी (बकल नं. ४४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. क्र. १२३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.