राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात

लांजा, रत्नागिरी:
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड (तालुका लांजा) घाटात शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. अपघातामुळे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ऑरा कारला मागून येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ऑरा कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच ती जळून खाक झाली. अपघातापूर्वीच वाहनातील सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उभ्या ऑरा कारला स्कॉर्पिओची धडक; पाहता पाहता कार झाली बेचिराख

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ऑरा कार (क्रमांक MH 48 GQ 3557) एका अपघातामुळे महामार्गाच्या कडेला उभी होती. त्याच वेळी गोव्याच्या बाजूने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारने (क्रमांक MH 47 BT 8006) या उभ्या असलेल्या ऑरा कारला भीषण धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे ऑरा कारने पेट घेतला आणि पाहता पाहता आग संपूर्ण कारमध्ये पसरून गाडी बेचिराख झाली. सुदैवाने प्रवाशांनी प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
लांजा पोलीस आणि अग्निशमन दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारळकर, पोलीस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्नील कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी महामार्ग पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या अपघाताचा पुढील अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.













