Ratnagiri Boat Accident: राजीवडा समुद्रात मच्छीमारी बोट उलटली; ८ जणांना वाचवण्यात यश

Ratnagiri Boat Accident: राजीवडा समुद्रात मच्छीमारी बोट उलटली; ८ जणांना वाचवण्यात यश

‘ओशियन पर्ल’ बोटीला महाकाय लाटेचा तडाखा; ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशांनी देवदूतासारखे धावून येत आठही जणांचे वाचवले प्राण

रत्नागिरी:
रत्नागिरीतील राजीवडा समुद्रात लाईट हाऊस परिसरात रविवारी सकाळी मासेमारी करून परतणाऱ्या ‘ओशियन पर्ल’ या बोटीला महाकाय लाटेने तडाखा दिल्याने बोट समुद्रात उलटल्याची थरारक घटना घडली. या अपघातात बोटीवरील आठही मच्छीमार खोल समुद्रात फेकला गेले. मात्र, मागून येणाऱ्या ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशी आणि सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ मदतकार्य राबवून आठही जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे समुद्रात घडणारा एक मोठा अनर्थ टळला आहे.

लाईट हाऊससमोर उसळली महाकाय लाट

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२० सप्टेंबर) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजीवडा येथील ‘ओशियन पर्ल’ ही छोटी नौका आठ खलाशांना घेऊन मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली होती. सकाळी मासेमारी आटोपून ८:४५ वाजण्याच्या सुमारास ही नौका राजीवडा जेटीच्या दिशेने परत येत होती. नौका लाईट हाऊस समोर आली असता अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली. या लाटेच्या तडाख्यामुळे नौकेचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि काही क्षणांतच ‘ओशियन पर्ल’ समुद्रात उलटली.

cake of the day

आठही मच्छीमार पाण्यात फेकले गेले

नौका उलटल्याने बोटीवरील साद सिकंदर हुसये (वय २१), मुहाफीस मुजकीर मुकादम (वय २२), अहमद सुलेमान सोलकर (वय ३८), इम्तियाज मलिक मुजावर (वय २१), नासिर गफूर हुसये (वय ६०), शोएब नासिर हुसये (वय ३०), इमरान अन्वर डंगी (वय ३५) आणि तौसीफ सुलेमान सोलकर (वय ३५, सर्व रा. राजीवडा, ता. रत्नागिरी) हे आठही जण खोल समुद्रात फेकला गेले.

‘अल सुरया’ बोटीवरील खलाशांचे धाडसी मदतकार्य

नौका उलटल्याचे दृश्य त्याच मार्गावरून परतणाऱ्या ‘अल सुरया’ या बोटीवरील खलाशांनी पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने आपली बोट दुर्घटनेच्या दिशेने वळवली. सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी पाण्यात दोर व सहाय्यक साधने फेकून मदतकार्य सुरू केले. खालीद इस्माईल होडेकर, अजमल शब्बीर हुनेरकर, कैफ खालीद होडेकर, खलील अली मजगावकर आणि यासीन महमूद पावसकर (सर्व रा. राजीवडा) यांनी प्राणाची पर्वा न करता आठही मच्छीमारांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून ‘अल सुरया’ बोटीवर घेतले.

पोलीस प्रशासनाकडून पाहणी

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी व राजीवडा किनाऱ्यावर भेट देऊन पाहणी केली. किनाऱ्यावर आणल्यानंतर सर्व खलाशांची विचारपूस करण्यात आली. सुदैवाने आठही जण पूर्णपणे सुखरूप असून त्यांनी वैद्यकीय तपासणीची गरज नसल्याचे सांगितले.