Lanja Highway Accident: वाकेड घाटात विचित्र तिहेरी अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ओरा कारने घेतला पेट

Lanja Highway Accident: वाकेड घाटात विचित्र तिहेरी अपघात; स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ओरा कारने घेतला पेट

चालकाचे प्रसंगावधान आणि प्रवाशांची तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

लांजा (रत्नागिरी):
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात शनिवारी पहाटेच्या सुमारास एक विचित्र आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनरने धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ओरा कारला मागाहून आलेल्या भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर ओरा कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच ती जळून खाक झाली. सुदैवाने, कारमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिल्या अपघातात चालक व प्रवासी बालंबाल बचावले

लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विक्रोळी येथून ‘अंशिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून ओरा कार (क्रमांक MH 48 DQ 3557) प्रवाशांना घेऊन कणकवलीच्या दिशेने जात होती. सिकंदरकुमार किशोर साव (वय २३, रा. विरार, जि. पालघर) हे कार चालवत होते. शनिवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास वाकेड घाटात कार आली असता एका कंटेनरने तिला धडक दिली. त्यामुळे कार महामार्गाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील सर्व प्रवासी बचावले.

tata motars

दुसऱ्या धडकेनंतर कारने घेतला रौद्ररुप पेट

पहिल्या अपघातात कारच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याने ती महामार्गाच्या बाजूला उभी करून चालक व प्रवासी क्रेनची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओचे (क्रमांक MH 47 BT 8006) नियंत्रण सुटले आणि तिने उभ्या असलेल्या ओरा कारला मागून जोरदार धडक दिली. नीरज मायशंकर यादव (वय २५, रा. उजैनपूर, उत्तर प्रदेश) हा स्कॉर्पिओ चालवत होता. या धडकेनंतर ओरा कारने तात्काळ पेट घेतला आणि आगीचे लोळ व धुराचे लोट महामार्गावर पसरले.

पोलिस आणि अग्निशमन दलाकडून तातडीने मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारळकर, पोलीस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्निल कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचा मारा करून ओरा कारची आग आटोक्यात आणली. वाहनातील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.