२०२७ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारले जाणार तब्बल ४० प्रश्न; केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वेळापत्रक जाहीर

२०२७ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारले जाणार तब्बल ४० प्रश्न; केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वेळापत्रक जाहीर

२०११ च्या तुलनेत १० नव्या प्रश्नांचा समावेश; बँक खाती, कोविड लस, ओळखपत्रांसह डिजिटल साक्षरतेची नोंद होणार

नवी दिल्ली : देशात पार पडणाऱ्या आगामी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू झाली असून केंद्रीय गृह खात्याने या टप्प्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये नागरिकांना एकूण ४० प्रश्न विचारण्यात येणार असून २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत यावेळी १० अतिरिक्त प्रश्नांची भर घालण्यात आली आहे.

निवडणूक राज्यांत डिसेंबरपासून जनगणना प्रक्रिया :

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत जनगणना प्रक्रिया राबवली जाईल. प्रत्यक्ष गणनेनंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ दरम्यान पडताळणीसाठी पुनर्तपासणी फेरी (Revision Round) पार पडेल. गोव्यातील नागरिकांच्या सोयीसाठी १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘ऑनलाइन स्वयं नोंदणी’चा (Self-Enumeration) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Vinayka motars

वैयक्तिक ओळख व दस्तऐवजांची माहिती :

नागरिकांकडून नाव, लिंग, वय आणि राष्ट्रीयत्व यांसारखी प्राथमिक माहिती घेतली जाईल. त्यासोबतच मोबाईल क्रमांक, बँक खात्यांची संख्या, कोविड लस घेतल्याची जागा, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट क्रमांक, आधार कार्ड, वाहन परवाना आणि आई-वडिलांविषयीचा तपशीलही नोंदवला जाणार आहे.

शिक्षण, रोजगार व सामाजिक स्थिती :

कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा व अवगत असलेल्या इतर भाषांची नोंद केली जाईल. शिक्षणाचा स्तर, साक्षरतेसोबतच आधुनिक डिजिटल साक्षरतेविषयी विचारणा केली जाईल. तसेच रोजगार, व्यवसाय, जन्मस्थान, स्थलांतराचे नेमके कारण आणि कायमचा पत्ता याविषयी सविस्तर माहिती संकलित केली जाईल.

वैवाहिक व कौटुंबिक तपशील :

वैवाहिक स्थिती, विवाहाच्या वेळचे वय आणि जोडीदाराचे नाव जनगणनेत नोंदवले जाईल. याशिवाय विवाहित, विधवा अथवा घटस्फोटित महिलांसाठी सध्या जिवंत असलेल्या सर्व अपत्यांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.