मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाकडून इशारा
मुंबई:
देशातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असला तरी बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होत आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेण्यास सुरुवात केली असली तरी, २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसामुळे सप्टेंबरच्या शेवटी कोरड्या हवामानापासून सुटका होऊन बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्याला मिळणार थेट फायदा
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला मिळणार आहे. उत्तर अंदमान समुद्र परिसरात तयार झालेली वाऱ्यांची चक्राकार स्थिती तीव्र होऊन पुढील ३-४ दिवसांत दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे. या हवामान बदलामुळे येत्या २३ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमध्येही पावसाचा जोर
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच २१ सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असून २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील.
मान्सूनच्या परतीचा प्रवास आणि शेवटचा टप्पा
मान्सूनने यंदा नियमानुसार १७ सप्टेंबरऐवजी दोन दिवस उशिरा, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत राजस्थान, पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छ भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्यासाठी हवामान अनुकूल आहे. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनच्या या शेवटच्या टप्प्यात २८ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या पावसामुळे पिकांना आणि शेतीला चांगला आधार मिळणार आहे.













