मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात यशस्वी समन्वय साधला; ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये म्हणून सरकार प्रयत्नशील
रत्नागिरी:
मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य विविध प्रश्नांवर इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजावर कोणताही अन्याय न होता योग्य तोडगा काढण्याची राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या काळात सरकारने समन्वयाची भूमिका घेतली आणि त्याला मोठे यश आले. आता ९० दिवसांनंतर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतून मार्ग काढला
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, सरकारने सर्व प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. जरांगे-पाटील यांच्याशीही आपण स्वतः समन्वयाची भूमिका बजावली. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सरकारच्या या विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे सरकारची समन्वय प्रक्रिया यशस्वी ठरल्याचे सामंत यांनी नमूद केले.

ओबीसींचे गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीची मागणी
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार कटिबद्ध असले तरी त्यासाठी ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल. यासाठी ओबीसी प्रश्नांवर स्वतंत्र व सविस्तर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यावर योग्य मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकार ५ सॅटेलाईट तयार करणार
यावेळी इतर घडामोडींवर माहिती देताना सामंत यांनी सांगितले की, राज्य सरकार स्वतःचे ५ सॅटेलाईट तयार करण्याच्या दिशेने काम करीत असून यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. याशिवाय शेतकरी आणि बळीराजाला सरकार कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयीन प्रकरणांवर बोलण्यास नकार
संजय राऊत आणि दिशा सालियन प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना, "ही न्यायालयीन बाब असल्याने त्यावर भाष्य करणार नाही. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे," असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. तसेच पत्रकारांनी त्यांना ‘संकटमोचक’ म्हणून संबोधले असता, "मी संकटमोचक नाही, सध्या मोदकाचा जमाना आहे," अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.













