चाकाळे हनुमान नगरमधील घटना; डोक्यात व अंगावर काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
खेड : चाकाळे हनुमान नगर परिसरामध्ये जुन्या वादाचा राग मनात धरून एका इसमाला शिवीगाळ करत बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात राजेश सखाराम कदम (वय ४५, रा. चाकाळे हनुमाननगर, ता. खेड) हे जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून शिवीगाळ व मारहाण :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेश कदम हे चाकाळे हनुमान नगर येथील ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी दिपक पांडुरंग भिलारे, पुष्पा पांडुरंग भिलारे आणि दिपक भिलारे यांचा मुलगा (सर्व रा. चाकाळे जगदीशनगर, ता. खेड) तिथे आले. त्यांनी फिर्यादीस अचानक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

बांबूच्या काठीने अंगावर वार :
वादादरम्यान संशयित आरोपी दिपक भिलारे याने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने राजेश कदम यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर, पाठीवर आणि छातीवर जोरदार तडाखे मारून त्यांना गंभीर दुखापत केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
खेड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल :
हल्ल्यानंतर जखमी राजेश कदम यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी संशयित तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गु.र.नं. ३१४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.













