ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली नोटीस
मुंबई:
दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, शनिवारी (१९ सप्टेंबर) ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या मुख्य गेटबाहेर जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे स्वतः वकिलांच्या संपूर्ण टीमसह आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तब्बल ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असून, त्या संदर्भातील नोटीस देण्यासाठी ते तिथे पोहोचले होते.
‘फक्त देव मला कंट्रोल करू शकतो’ – सतीश सालियान आक्रमक
मातोश्रीवर पोहोचण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश सालियान अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. फक्त देव मला कंट्रोल करू शकतो, दुसरं कोणीही नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली. मातोश्रीबाहेर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यासोबत वकिलांची पूर्ण टीम आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर समाधान व्यक्त करत त्यांनी, "सामोऱ्या बाजूने वेळ घेतल्यामुळे सहा वर्षे गेली," असे नमूद केले.

मातोश्रीबाहेर शिवसैनिक आक्रमक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सतीश सालियान आणि त्यांच्या वकिलांची टीम आल्याची माहिती मिळताच मातोश्रीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मातोश्रीचे मुख्य गेट बंद करून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले. सतीश सालियान यांना आत जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत घटनास्थळी उपस्थित शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
ठाकरेंच्या वकिलांनी स्वीकारली ५०० कोटींची नोटीस
या संपूर्ण वादानंतर आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी वकील दिले. ॲडव्होकेट राहुल दिवटे आणि ॲडव्होकेट अनिल जाधव हे नोटीस स्वीकारण्यासाठी थेट मातोश्रीच्या मुख्य गेटवर उपस्थित राहिले. अखेर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सतीश सालियान यांच्याकडून ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस स्वीकारली आणि त्या नोटीस स्वीकारल्याची स्वाक्षरी केलेली पावती सतीश सालियान यांच्या वकिलांकडे सुपूर्द केली.













