जयगड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद; अतीवेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप
जयगड : गडनरळ चौकेवाडी येथील रस्त्याच्या वळणावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात महिंद्रा बोलेरो गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोलेरो चालकाविरोधात वाहनावरील ताबा सुटून निष्काळजीपणे अपघात घडवल्याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खड्डा चुकवताना स्टेअरिंग वळवले अन् गाडी पलटी झाली :
मिळालेल्या माहितीनुसार, चालक लिलाधर आत्माराम खाडे (रा. जयगड सडेवाडी) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो गाडीमधून (क्र. MH 08 AN 9082) प्रदीप वाघोदे, प्रेमचंद ओझा आणि अनिल दधिच यांना घेऊन गडनरळ ते जयगडच्या दिशेने येत होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गडनरळ चौकेवाडी येथील रस्त्याच्या वळणावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. गाडी उजव्या बाजूला जात असल्याचे लक्षात येताच चालकाने स्टेअरिंग अचानक दुसऱ्या बाजूला वळवले, ज्यामुळे भरधाव बोलेरो जागीच पलटी झाली.
दोघे जण गंभीर जखमी, गाडीचे मोठे नुकसान :
या भीषण अपघातात वाहनातील प्रवासी प्रदीप पुनाजी वाघोदे (वय ५७, रा. आदर्श नगर, वाटद-खंडाळा) आणि प्रेमचंद दयानंद ओझा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात बोलेरो गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जयगड पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल :
अपघातात जखमी झालेले फिर्यादी प्रदीप वाघोदे यांच्या तक्रारीवरून जयगड पोलिसांनी संशयित चालक लिलाधर आत्माराम खाडे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ आणि १२५(ब) अन्वये गु.र.नं. ७२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.













