ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला भीषण अपघात; असगोली खारवीवाडीतील तरुण जखमी
गुहागर : चिपळूण ते गुहागर मार्गावर खातू मसाले उद्योगासमोरील वळणावर एसटी बसने समोरून येणाऱ्या रॉयल एनफिल्ड बुलेटला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगात बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओव्हरटेक करताना बसची बुलेटला धडक :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास गुहागर बाजूकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा (क्र. MH 14 BT 4667) चालक नामदेव शिवाजी पवार (वय ४०, मूळ रा. भानखेडा, ता. शेणगाव, जि. हिंगोली, सध्या रा. संभाजीनगर वळंज बजाज नगर) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. वळणावर पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस उजव्या बाजूला घेतली असता समोरून येणाऱ्या रॉयल एनफिल्ड बुलेटला (क्र. MH 08 BF 2691) बसच्या चालकाच्या बाजूकडील पाठीमागील भागाची जोरात धडक बसली.
बुलेटस्वार गंभीर जखमी, वाहनाचे मोठे नुकसान :
या अपघातात बुलेटस्वार चैतन्य अनंत जाखळे (वय ३३ वर्षे, रा. असगोली खारवीवाडी, ता. गुहागर) हे गंभीर जखमी झाले. तसेच धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या बुलेट दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमी तरुणावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले.

गुहागर पोलिसांत एसटी चालकावर गुन्हा नोंद :
या अपघाताप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिकेत अविनाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक नामदेव पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गु.र.नं. ९६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.













