बांबूचे कुंपण तोडून वृद्ध महिलेला शिवीगाळ व दमदाटी; चिपळूण तालुक्यातील घटना
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी येथे न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा राग मनात धरून शेतात बेकायदेशीररीत्या प्रवेश करत कुंपण तोडणे, नव्याने लावलेली आंब्याची रोपे उखडून टाकणे आणि विरोध करणाऱ्या वृद्ध महिलेला दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्टातील दाव्याचा राग मनात धरून अतिक्रमण :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन काशीराम कदम (वय ४३ वर्षे, मूळ रा. तिवरे फणसवाडी, सध्या रा. डोंबिवली, जि. ठाणे) आणि संशयितांमध्ये जमिनीवरून न्यायालयात दावा प्रलंबित आहे. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिवरे फणसवाडी येथील जमीन गट क्र. १५७० मध्ये संशयित मधुकर गणपत कदम (वय ६५), मनिषा गणपत कदम (वय ६०) आणि गोविंद गणपत कदम (वय ७०) यांनी संगनमत करून अनधिकृतरीत्या प्रवेश केला.
आंब्याची कलमे उखडून नुकसान, महिलेला शिवीगाळ :
संशयितांनी शेताभोवती घातलेले बांबूचे कुंपण तोडून टाकले आणि जागेत नव्याने लागवड केलेल्या आंब्याच्या कलमांपैकी ४ रोपे मुळासकट उपटून फेकून देत मोठे आर्थिक नुकसान केले. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांच्या वृद्ध आईने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची दमदाटी केली.

अलोरे-शिरगाव पोलिसांत तिघांवर गुन्हा नोंद :
या प्रकरणी फिर्यादी मोहन कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२९(३), ३२४(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गु.र.नं. १११/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.













