तिडे निमदेवाडीतील घटना; पोलिसांकडून धारदार चाकू जप्त
मंडणगड : गावात उघड्यावर हातात चाकू घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताकडून २० रुपये किमतीचा लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला आहे.
गावात चाकू घेऊन फिरताना पोलिसांकडून कारवाई :
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास तिडे निमदेवाडी (ता. मंडणगड) येथे नितीन नरेश मोहिते (वय २९ वर्षे, रा. तिडे निमदेवाडी) हा तरुण हातामध्ये उघडा चाकू घेऊन फिरत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.
मंडणगड पोलिसांत गुन्हा नोंद :
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल विठोबा कोळथरकर (ब.नं. १३५७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन मोहिते याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गु.र.नं. ११७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.














