भोस्ते येथील संशयिताला रंगेहात पकडले; सुझुकी ॲक्सेस स्कुटीसह ३२० ग्रॅम गांजा पोलिसांच्या ताब्यात
खेड : खेड-दापोली रस्त्यावर फुरूस गावच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गांजा बाळगून थांबलेल्या एका तरुणाला खेड पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून ३२० ग्रॅम गांजा, दुचाकी आणि रोख रक्कमेसह एकूण १ लाख ६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुरूस येथे पोलिसांचा छापा :
खेड पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मौजे फुरूस येथे खेड-दापोली रस्त्याच्या कडेला कारवाई करण्यात आली. संशयित तरुण तेथे संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला सुकलेला गांजा आढळून आला.

१ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त :
कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी सकलेन अस्लम अंतुले (वय २९ वर्षे, रा. भोस्ते जलालशहा मोहल्ला, ता. खेड) याच्याकडून १६ हजार रुपये किमतीचा ३२० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा, गुन्ह्यात वापरलेली ९० हजार रुपये किमतीची राखाडी रंगाची सुझुकी ॲक्सेस १२५ स्कुटी आणि ५० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
खेड पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल :
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे (ब.नं. २५८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सकलेन अंतुले याच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ चे कलम ८(क), २०(ब) आणि २(ब) प्रमाणे गु.र.नं. ३१५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.













