चोरीच्या उद्देशाने वावरत असल्याचा संशय; उत्तर प्रदेशातील एकास पोलिसांनी घेतले ताब्यात
दाभोळ : दाभोळ एसटी बसस्थानक परिसरात रात्रीच्या सुमारास एका टपरीच्या मागे स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला दाभोळ सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टपरीच्या मागे लपून संशयास्पद हालचाली :
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास दाभोळ एसटी स्टँड येथील एका टपरीच्या मागे एक संशयित इसम दबा धरून बसल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले. सूर्यास्तानंतर चोरी किंवा इतर गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने तो अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवत होता.

चौकशीत दिली उडवाउडवीची उत्तरे :
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तेथे थांबण्याचे कारण विचारले तसेच त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने समाधानकारक माहिती न देता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे नाव राजेशकुमार योगेंद्र प्रसाद गौतम (वय २३ वर्षे, रा. फुलवारिया, ता. गोपालपूर, जि. संत कबीरनगर, राज्य उत्तर प्रदेश) असल्याचे समोर आले.
दाभोळ सागरी पोलिसांत गुन्हा नोंद :
या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दैवत दिलीप राणे (ब.नं. ९३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेशकुमार गौतम याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२(क) अन्वये गु.र.नं. ३६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.













