विनोद तावडे उत्तर प्रदेशचे, तर डॉ. भारती पवार गोव्याच्या प्रभारी; बैजयंत पांडा यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा
मुंबई :
भाजप प्रभारी यादी जाहीर करत भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या पक्षसंघटनेत अत्यंत महत्त्वाचे आणि आमुलाग्र बदल केले आहेत. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि २०२९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय पातळीवर नवीन प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा केली आहे. या नव्या फेरबदलात महाराष्ट्रातील चार प्रमुख नेत्यांवर भाजप नेतृत्वाने मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांचे राष्ट्रीय राजकारणात स्थान बळकट

या नव्या नियुक्तीनुसार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे गोवा राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची दिल्ली भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे, तर पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी वर्णी लागली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी राज्यसभा खासदार बैजयंत जय पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
भाजप प्रभारी यादी: प्रमुख राज्ये आणि नियुक्त नेत्यांचा तपशील
भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार देशातील विविध राज्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत:
उत्तर प्रदेश: प्रभारी – श्री विनोद तावडे | सहप्रभारी – श्रीमती मेधा कुलकर्णी, श्री जगदीश पटेल, डॉ. प्रदीप शर्मा, श्री अनंत ओझा
महाराष्ट्र: प्रभारी – श्री बैजयंत जय पांडा | सहप्रभारी – श्री अमित मालवीय, श्री सदानंद शेट तानावडे, श्रीमती कमलजीत सहरावत
दिल्ली: प्रभारी – डॉ. विनय सहस्रबुद्धे | सहप्रभारी – श्री जामयांग त्सेरिंग नामग्याल, श्रीमती दर्शानाबेन जरदोश
गोवा: प्रभारी – डॉ. भारती प्रवीण पवार | सहप्रभारी – श्री अनिल अँटनी
छत्तीसगड आणि हरियाणा: प्रभारी – श्रीमती स्मृती इराणी
कर्नाटक आणि बिहार: प्रभारी – श्री हरीश द्विवेदी
गुजरात: प्रभारी – श्री तरुण चुघ
उत्तराखंड आणि तमिळनाडू: प्रभारी – श्री राम माधव
हिमाचल प्रदेश: प्रभारी – श्री श्रीकांत शर्मा
पश्चिम बंगाल आणि तेलंगणा: प्रभारी – श्री सुनील बंसल
संघटनेत तरुणांना संधी आणि आगामी निवडणुकांचे नियोजन
नितीन नवीन यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्षसंघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी ही नवी रणनीती आखली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने अनेक अनुभवी आणि तरुण नेत्यांचा मेळ घालत राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.













