“पहिले मतचोरी, मग कायदा चोरी आणि नंतर संस्था चोरी!” सत्ताविरोधी लाट गायब होण्यावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
Rahul Gandhi Allegations CEC: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या धडाकेबाज पत्रकार परिषदेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, मतचोरी आणि घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत असल्याचा दावा करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक यशावर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पारदर्शकतेवर १० मोठे प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधींनी केलेले १० प्रमुख आरोप आणि Rahul Gandhi Allegations CEC
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मांडलेले १० प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
निवडणुकांमध्ये हेराफेरी व राजीनाम्याची मागणी: सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाली असून मते बाद केली जात आहेत. दोन निवडणूक आयुक्तांनीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर थेट आरोप: २०१३ पासून आम्ही याविरोधात पुराव्यांसह आवाज उठवत आहोत. मतचोरी सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा यात समावेश आहे; त्यांनी देशाचा लोकशाही पाया उद्ध्वस्त केला आहे.
कायदे आणि संस्थांची चोरी: कायदे मतांनी बनतात. जर मतेच बाद केली तर कायदा, संस्था आणि लोकशाही संपते. केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवून अभय दिले आहे. त्यांच्या दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लावलेल्या आरोपांवर आम्ही शांत बसणार नाही.
घटनात्मक संस्थांवर ताबा: निवडणुका आता निरर्थक झाल्या आहेत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देशातील प्रत्येक घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवला आहे.
सत्ताविरोधी लाट गायब होणे: भारतातील प्रत्येक सरकारला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतो. १९७१ मध्ये बांगलादेश युद्ध जिंकूनही इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, मग भाजपच्या बाबतीत अचानक ही सत्ताविरोधी लाट गायब कशी होते?
जागतिक लोकशाहीतील विसंगती: एखाद्या नेत्याची लोकप्रियता किंवा सरकारचे काम समजू शकते, परंतु जगात अशी कोणतीही लोकशाही नाही जिथे सत्ताविरोधी लाट अजिबात अस्तित्वातच नसून पूर्णपणे नाहीशी होते.
हरियाणा आणि महाराष्ट्राचा संदर्भ: मी गेल्या ५० वर्षांपासून भारतीय राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करत आहे, असे कधीही घडले नाही. केंद्र असो वा राज्य, विरोधात लाट असतेच. मग भारतातील ही सर्वात मोठी राजकीय शक्ती कुठे गायब झाली? हरियाणा आणि महाराष्ट्रात याचे परिणाम स्पष्ट दिसले आहेत.
दोन आयुक्तांचे आक्षेप: विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १०० टक्के हेराफेरी झाली आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या संपूर्ण प्रकाराला ज्ञानेश कुमारच जबाबदार आहेत.
हरियाणा निवडणुकीतील अनियमितता: मतचोरी आता कायदेशीर चोरी झाली आहे. चोरीच्या मतांनी खासदार-आमदार निवडून आले तर ती निवडणूक अवैध ठरते. हरियाणा निवडणुकीत अनेक गंभीर अनियमितता झाल्या असून आयोगाच्या आतूनच आता माहिती बाहेर येत आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याबाबत प्रश्न: देशात असा एकही पंतप्रधान झाला नाही ज्याला जनतेच्या सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला नाही. मग ही लाट केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याच विरोधात काम का करत नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
राजकीय वर्तुळात मोठे वादळ
Rahul Gandhi Allegations CEC नंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर आणि राजकीय लढाई तीव्र करण्याचे संकेत दिले असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे समजते.













