ECI SIR Dispute: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

ECI SIR Dispute: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

ज्ञानेश कुमारांच्या मनमानी कारभारावर दोन निवडणूक आयुक्तांचे १४ वेळा आक्षेप; राजीनाम्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम

ECI SIR Dispute: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीविरोधात आणि वादग्रस्त ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरोधात देशभरात राजकीय व न्यायालयीन संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने (Congress) देशभरात आक्रमक आंदोलने छेडली आहेत. उत्तराखंडमधील डेहराडून येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तर बिहारच्या पाटण्यात पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे (Water Cannons) सोडले.

सीजेपीचा २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी दिलेली ४८ तासांची मुदत संपत आल्याने, त्यांनी २ ऑक्टोबरपासून (गांधी जयंती) देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगातील वाद चव्हाट्यावर आल्याने विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात याचिका; SIT चौकशीची मागणी
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत एसआयआरचे निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे आणि सॉफ्टवेअरमधील केलेले बदल घटनाबाह्य घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सुमारे १३ कोटी पात्र मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळल्याप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीचे आदेश द्यावेत, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे.

Shanti2

मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका
महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन निवडणूक आयुक्तांचा तीव्र विरोध आणि आक्षेप असतानाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी मनमानीपणे एसआयआरशी संबंधित १४ आदेश जारी केले, असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. हे सर्व १४ बेकायदेशीर आदेश रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

ECI SIR Dispute आणि २ निवडणूक आयुक्तांचे १४ लेखी आक्षेप
‘द इंडियन एक्सप्रेस’ मधील वृत्तानुसार, गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयोगाच्या दोन सह-आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. एकाच दिवशी ४ वेळा आक्षेप घेण्याची वेळ आली होती, एवढेच नव्हे तर दोन आयुक्तांनी थेट कॅबिनेट सचिवांकडे धाव घेतली होती. काँग्रेसने या वृत्ताचा आधार घेत ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगात मनमानी करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.

दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे उत्तर प्रदेशातील मेरठ आणि वाराणसी येथील २५ सप्टेंबरचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, आयोगाने हे कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजीच पुढे ढकलले असल्याचे सांगत वादाशी याचा संबंध नसल्याचा स्पष्टीकरण दिले आहे.