रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू: पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे पालकांना आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी च्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

रत्नागिरी केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी च्या प्रवेशाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन उद्योग तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले आहे. “शिक्षण हाच खरा विकास” हा विचार समोर ठेवून मुलांच्या गुणवत्तेला व भविष्याला आकार देण्यासाठी पालकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी

प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म दाखला, जन्मतारखेचा पुरावा (३१ मार्च २०२६ रोजीच्या वयानुसार), ओळख पुरावा, रक्तगटाचे प्रमाणपत्र आणि निवासाचा दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय सामाजिक व आर्थिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी लागू असल्यास EWS प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड, SC/ST/OBC-NCL जात प्रमाणपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रमाणपत्र व बदल्यांच्या संख्येबाबतचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच इतर पूरक कागदपत्रे जोडायची आहेत.

प्रवेश निश्चिती आणि संपर्क ठिकाण

केंद्रीय विद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना पाल्याच्या मागील इयत्तेचा शाळा सोडल्याचा दाखला (टी. सी.) आणि गुणपत्रक जमा करावे लागणार आहे. प्रवेशाबाबत अधिक माहिती आणि प्रत्यक्ष संपर्कासाठी पालकांनी केंद्रीय विद्यालय, लोकमान्य टिळक, नगर परिषद शाळा क्रमांक २, रत्नागिरी – ४१५६३९ या पत्त्यावर भेट द्यावी, असे आवाहन विद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 03-10-2026

Arihant 1