रत्नागिरीत ‘कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा’ जाहीर: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अधिकृत घोषणा

नाट्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मे २०२७ दरम्यान आयोजन; उत्सव मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरीत ‘रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा’ जाहीर झाली असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीतर्फे आयोजित ‘कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेच्या (२०२६-२०२७)’ यंदाच्या मोसमाची अधिकृत उद्घोषणा करण्यात आली आहे. नाट्य परिषदेचे विश्वस्त, उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व घोषणा करण्यात आली. लोककलेपाठोपाठ नाट्यकला हा देखील आपल्या संस्कृतीचा मुख्य भाग असून, हा समृद्ध वारसा आपण जपत आहोत, असे गौरवोद्गार डॉ. उदय सामंत यांनी याप्रसंगी काढले.

५७ नाटकांच्या यशानंतर यंदाही रत्नागिरी तालुक्यापुरती मर्यादित

गतवर्षी या स्पर्धेला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता आणि ५७ नाटकांचे यशस्वी सादरीकरण झाले होते. यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि रत्नागिरी तालुक्यापुरती मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मे २०२७ या दीर्घ कालावधीत पार पडणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त उत्सव मंडळांनी त्यांच्या उत्सवासाठी निर्मित केलेले नाटक या स्पर्धेत सादर करावे, असे आवाहन नाट्य परिषदेकडून करण्यात आले आहे. स्पर्धेची सुधारित नियमावली आणि प्रवेश अर्ज आता उपलब्ध झाले आहेत.

बक्षिसांची लुटालूट आणि विविध विभाग

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांसाठी बक्षिसांची मोठी खैरात असणार आहे. यामध्ये सांघिक ३ मुख्य बक्षिसे आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे, तसेच १ विशेष लक्षवेधी नाटक बक्षीस दिले जाईल. याशिवाय पुरुष अभिनय, व्यावसायिक व हौशी स्त्री अभिनय, विनोदी अभिनय, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि रंगभूषा-वेशभूषा या प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ३ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच ५ स्थानिक लेखक प्रोत्साहनपर, ३ बालकलाकार प्रोत्साहनपर आणि प्रत्येक नाटकातील एका लक्षवेधी अभिनेत्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.

स्पर्धा संयोजन आणि संपर्क

या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून संतोष सनगरे हे काम पाहणार असून मुख्य समन्वयक म्हणून श्रीकांत भाटवडेकर आणि विजय पोकळे जबाबदारी सांभाळत आहेत. स्पर्धेत सहभागासाठी किंवा अधिक माहितीसाठी संतोष सनगरे (९४२११८६०७८) किंवा अमेय धोपटकर (८८८८०३३६२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.

Ronic

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 03-10-2026