Shivaji Park Protest: शिवाजी पार्कवर सीजेपीचे आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

म. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुंबईत तरुणाईचा आक्रोश; नसरुद्दीन शाह, शर्लिन चोपडा आणि विशाल दादलानी यांची आंदोलनाला उपस्थिती

शिवाजी पार्कवर सीजेपीचे आंदोलन शुक्रवारी (२ ऑक्टोबर) अत्यंत आक्रमकपणे पार पडले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर हे आंदोलन पुकारले. पहिल्या आंदोलनातून धडा घेऊन आज सर्वजण तयारीनिशी रस्त्यावर उतरले आहेत; तुम्ही लाठ्या-काठ्या हाणा किंवा तुरुंगात टाका, आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार या आंदोलनात सहभागी झालेल्या एका युवतीने व्यक्त केला.

‘आम्हाला तुरुंगात टाका, मी पुन्हा येईन’; अभिजीत दिपकेंचा थेट हल्लाबोल

आंदोलनाचे नेतृत्व करताना अभिजीत दिपके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ऐकताय ना, आंदोलन केले म्हणून तुम्ही आम्हाला तीन दिवस तुरुंगात टाकणार असाल, तर या आम्हाला तुरुंगात टाका. तीन दिवस नाही तर तीन महिने जेलमध्ये ठेवा! जेलमधून बाहेर आल्यानंतर मी तीच गोष्ट पुन्हा म्हणेन जी तुम्ही म्हणायचे— ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’,” अशा तिखट शब्दांत दिपकेंनी मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी केली.

हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्रीबाई, आंबेडकर, शाहू आणि फुल्यांचा आहे, याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावे, असे सांगत तुमची खुर्ची फेव्हिकॉलने टिकवलेली आहे, ती कधी पडेल हे सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि जोरदार घोषणाबाजी

दिल्लीतील आंदोलनानंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत सीजेपीचा हा एल्गार पाहायला मिळत आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर जमा झालेल्या हजारो आंदोलकांनी महात्मा गांधी आणि वंदे मातरमच्या घोषणा देत “इस्तिफा दो… इस्तिफा दो…” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. आंदोलनादरम्यान गांधीजींचा वेश परिधान करून आलेल्या एका तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Infigo Eyecare

सेलिब्रिटींचा पाठिंबा आणि वाहतुकीत बदल

या आंदोलनाला मुंबईतील तरुणाईसोबतच अनेक दिग्गज कलाकारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि प्रसिद्ध संगीतकार-गायक विशाल दादलानी या आंदोलनात सहभागी झाले होते. नसरुद्दीन शाह यांनी अभिजीत दिपके यांच्या धाडसाचे कौतुक केले, तर विशाल दादलानी यांनी घोषणा देत विरोध दर्शवला.

दरम्यान, शिवाजी पार्कवर तरुणांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केवळ सेना भवन ते दादर स्टेशन आणि वांद्रे ते सीएसटी असाच मार्ग सुरू ठेवण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 03-10-2026