संगमेश्वरनजीक वांद्री येथे कारचा भीषण अपघात: रस्त्यालगतच्या दगडाला आदळून कार उलटली, मुंबईतील ३ प्रवासी जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडली दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली, स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल

संगमेश्वरनजीक वांद्री येथे कारचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरनजीक असलेल्या वांद्री सप्तलिंगी पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या दगडावर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

धडक इतकी तीव्र की तीन टायर्स फुटले

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी येथून रत्नागिरीच्या दिशेने निघालेली फॉक्सवॅगन कार वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ पोहोचली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कार रस्त्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर अत्यंत वेगात आदळली. दगडाला बसलेली धडक इतकी भीषण होती की कारचे तीन टायर्स जागीच फुटले आणि गाडी रस्त्यावरच उलटून संगमेश्वरच्या दिशेने तोंड करून थांबली.

स्थानिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना केले बाहेर

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू करत कारमध्ये अडकलेल्या तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींची नावे त्वरित उपलब्ध होऊ शकली नाहीत.

Infigo Eyecare

वाहतूक काही काळ विस्कळीत

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 03-10-2026