आरगाव खालील वाडीतील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
लांजा येथे तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. आजारपणाला आणि शारीरिक अस्वास्थ्याला कंटाळून त्याने विहिरीत उडी मारून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
आजारपणामुळे मानसिक तणावात होता तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव याच्या कमरेखालील शरीराची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय तसेच पाली येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दीर्घकालीन प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि आजारपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावात होता.
शोधाशोध दरम्यान विहिरीत आढळला मृतदेह
शुक्रवारी दुपारी मयूर घरातील कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेला. तो बराच वेळ घरी न परतल्याने चिंताग्रस्त झालेल्या नातेवाईकांनी आणि वाडीतील ग्रामस्थांनी परिसर अन् जंगलात त्याचा शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान वाडीतील मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीच्या पाण्यात मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
ग्रामस्थांनी तत्काळ प्रसंगावधान राखून मयूरला विहिरीतून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून लांजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 03-10-2026















