Dapoli Accidental Shooting: ‘त्या’ शिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

दापोलीत मिसफायरिंगमध्ये एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

दापोलीत बंदुकीतून अचानक गोळी सुटून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी खोंडारणवाडी येथे जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विनापरवाना बंदुकीतून अचानक गोळी सुटल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्काळजीपणामुळे बंदुकीतून सुटली गोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खोंडारण धारणेकडील जंगलमय भागात सचिन शांताराम शिगवण (वय ४२, रा. वणोशी खोंडारणवाडी, ता. दापोली) आणि सुनील महादेव पान्दे (वय ४६, रा. वणोशी खोंडारणवाडी) हे दोघे शिकारीची वाट पाहत बसले होते. यावेळी सचिन शिगवण याने सोबत आणलेली विनापरवाना आणि बेकायदेशीर काडतूस भरलेली बंदूक अतिशय निष्काळजीपणे हाताळली. यादरम्यान पाय लागून बंदूक पायातून सटकली आणि खाली दगडावर आपटली. या धक्क्याने बंदुकीतून अचानक काडतूस फायर झाले.

उपचारापूर्वीच मृत्यू आणि साथीदार जखमी

गोळीबारामुळे सुटलेले छरे सचिन शिगवण याच्या मांडीतून आणि गुप्त भागातून शरीरात शिरून पोटातून बाहेर आले. त्यामुळे तीव्र दुखापत होऊन उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तसेच सोबत असलेला सुनील महादेव पान्दे याच्या उजव्या पायाच्या ढोपराजवळ दोन छरे लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

दापोली पोलिसांत बेकायदेशीर शस्त्रासह गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा आदित्य हिरेमठ यांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्याद दिली. यानुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ), (ब) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ आणि ३/५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Khabardar diwali fest

घटनास्थळावरून पोलिसांनी रक्तमिश्रित माती, साधी माती, दोन जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतूस, २० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची सिंगल बॅरल १२ बोर रायफल आणि २ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 03-10-2026